मी एक लहान मुलगीच आहे, तरीही मला हे कळते की सगळ्या युद्धांवर खर्च झालेला सर्व पैसा पर्यावरणाच्या समस्यांवरील उत्तरे शोधण्यासाठी, दारिद्र्य निर्मुलनासाठीव बंधनकारक करार करण्यासाठी वापरण्यात आला असता, तर ही पृथ्वी किती सुंदर जागा झाली असती.” … संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये एक लहान मुलगी.

मला या मुलीचे नाव माहिती नाहीतसेच तिच्याविषयी कोणतेही तपशील उपलब्ध नाहीततरीही तिच्या या निरागस शब्दांमध्ये एवढी ताकद आहे की त्यामुळे कुणाचेही मन हेलावून जाईल (म्हणजे शहाण्या माणसाचे असे मला म्हणायचे आहे). म्हणून जागतिक पर्यावरण दिनाच्या (पुन्हा एकदा) निमित्ताने लिहीलेल्या या लेखासाठी मी तिचेच अवतरण वापरले आहे. मला जेव्हा सिम्बायोसिस कॉलेजमधून नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला १२वीच्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी कॉल आला व तो योगायोगाने जागतिक पर्यावरण दिन होता, तेव्हा मला दोन गोष्टींचा आनंद झाला. एक म्हणजे जवळपास तीन वर्षांनी मला मुलांशी असा प्रत्यक्ष संवाद साधता येत होता (लॉकडाउनची कृपा) व दुसरे म्हणजे सिम्बायोसिसचा हा किवळे येथील कॅम्पस मी अगदी मोकळी जमीन असल्यापासून ते आता जेवढा कीरवाईने विकसित झाला आहे तिथपर्यंतचा सगळा प्रवास पाहिला आहे. अशा जागांना भेट देणे नेहमीच आनंददायक असते कारण त्यामुळे तुमच्या मनाला सकारात्मकता मिळते विशेषतः जेथे उत्साही तरुणाई असते. अडचण अशी आहे की पर्यावरण हा गुंतागुंतीचा विषय आहे व इयत्ता १२वी च्या वयोगटातील मुलांना लवकर कंटाळा येतो. त्यातच मुले तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर प्रत्यक्षात एकत्र येणार होती. किंबहुना या बॅचचा हा कॉलेज जीवनाचाच पहिला दिवस होता, कारण त्यांनी ११वीचे अख्खे वर्ष ऑनलाईनच काढले. त्यामुळेच मी हा विषय व त्याचे सादरीकरण याविषयी अतिशय काळजी घेणे आवश्यक होते. या पिढीला अतिशय लवकर कंटाळा येत असल्यामुळे त्यांचे लक्ष या विषयावर गुंतवून ठेवणे हे पर्यावरण संवर्धनापेक्षाही अवघड काम होते!

पण हेच तर खरे शिकवणे असते, की विद्यार्थ्यांना शिकवणे हा तुमचा उद्देश असला तरीही तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारताय असे त्यांना वाटले पाहिजे, एक चांगला शिक्षक नेमके हेच करतो, नाही का? मी खरोखरच अतिशय सुदैवी आहे की माझ्या आयुष्यात मला काही चांगले शिक्षक मिळाले ज्यामुळे मला शिकवण्याचा हा सोपा नियम समजला. अर्थात मला तसे करणे प्रत्यक्षात कितपत जमते हे सांगणे कठीण आहे, हा भाग वेगळा. तर मी त्या मुलांच्या संस्थेविषयी म्हणजे सिम्बायोसिसविषयी माझ्या आठवणी सांगून बोलायला सुरुवात केली व मी जे काही बोललो ते येथे देत आहे…

खरेतर, माझी पिढी ही अतिशय नशीबवान आहे (म्हणजे जे सध्या ४५ हून वयोगटामध्ये मोडतात) कारण आम्हाला कधीच एवढे “दिवस” साजरे करावे लागत नव्हते किंवा त्यासोबत येणाऱ्या औपचारिकतांचे पालन करावे लागत नव्हते. आमच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये फक्त ‘ट्रॅडिशनल डे’, ‘रोझ डे’, ‘व्हॅलेंटाईन्स डे’ साजरा केला जात (त्यातही आमचे शेवटचे दोन दिवस तर फक्त इतर नशीबवान मुले ते साजरे करत असताना पाहण्यासाठीच होते) व सुदैवाने आम्हाला पर्यावरण दिनी कुणाचे व्याख्यान ऐकावे लागत नसे, वसुंधरा दिनाच्या निमित्ताने झाडे लावावी लागत नसत किंवा मदर्स डे, सिस्टर्स डे अथवा तत्सम कोणत्याही डेच्या निमित्ताने शुभेच्छा कार्डे पाठवावी लागत नसत. जागतिक पर्यावरण दिनाविषयी बोलायचे झाले, तर आमच्या पिढीकडे जे सुदैव होते त्याचा आम्ही योग्य प्रकारे वापर केला नाही, म्हणून तुमची ही पिढी दुर्दैवी ठरली आहे कारण तुम्हाला जागतिक पर्यावरण दिन साजरा करावा लागतोय. म्हणूनच मी सिम्बायोसिसच्या व्यवस्थापनाचे अशा कार्यक्रमाने शैक्षणिक वर्षाची सुरूवात केल्याबद्दल अभिनंदन करतो, कारण असे केले तरच काहीतरी आशा आहे. नाहीतर ही पिढीदेखील आम्ही पर्यावरणाविषयी जेवढे अडाणी होतो तशीच झाली तर या पुढच्या पिढ्यांसाठी हा दिवसही साजरा करण्यासाठी उरणार नाही.

तर आता या विषयावर बोलूयात, तुम्ही पर्यावरण हा विषय आकड्यांमध्ये, सूत्रांमध्ये किंवा तारखांमध्ये मांडू शकत नाही. जागतिक पर्यावरण दिनाची सुरूवात १९७४ साली झाली जेव्हा तुमच्यापैकी कुणाचा जन्मही झाला नव्हता, कदाचित तुमच्यापैकी बऱ्याचशा मुलांच्या पालकांचाही झाला नसेल. तरीही प्रत्येक सरत्या वर्षागणिक जागतिक पर्यावरण दिनाची गरज वाढतेय हे दुःखद वास्तव आहे. प्रत्येक जागतिक पर्यावरण दिनाची एक संकल्पना असते ज्यावर आधारित जागरुकता मोहिमा संपूर्ण वर्षभर चालविल्या जातात व यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना आहे “एक वसुंधरा”! आता, तुमच्यापैकी बरेच जण (म्हणजे अगदी मोठेही) “एक वसुंधरा” म्हणजे काय, आपण सगळे प्रत्यक्षात “एकाच पृथ्वीवर” राहात नाही का? तर, “एक वसुंधरा” म्हणजे प्रत्येक या पृथ्वीवरील प्रत्येक सजीव एकमेकांशी जोडला गेला आहे व आपल्या कृती कितीही वैयक्तिक असल्या तरीही त्यांचा कुठे ना कुठे इतर सजीवांवर परिणाम होतोच. निसर्ग हवा, पाणी, जमीन, जंगले व इतरह अनेक स्वरूपात आहे, आपण सगळे खरेतर एकत्रितपणे एकच प्रजाती आहोत, असा या एक वसुंधराचा अर्थ होतो. सर्वात प्रगल्भ व बुद्धिमान प्रजाती म्हणून आपले (माणसांचे) कर्तव्य आहे की आपण पुढाकार घेऊन पृथ्वीचे रक्षण केले पाहिजे. जागतिक पर्यावरण दिन २२ ची एक वसुंधरा संकल्पनाही आपल्याला हेच सांगते. तुम्हा मुलांना अवतार हा इंग्रजी चित्रपट आठवतोय का?, ज्याला तब्बल दहा ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. त्या चित्रपटामध्ये एका काल्पनिक ग्रहावर एक जीवनादायी झाड दाखवण्यात आले होते, जे त्या ग्रहाच्या उर्जेचा स्रोत होते, ते झाड त्या ग्रहावरील सर्व सजीवांशी जोडलेले होते. एक वसुंधरेचाही हाच अर्थ आहे कारण आपण इतर प्रजातींच्या गरजांना प्रतिसाद देणे आवश्यक आहे जे आपल्याशी एका अदृश्य बंधाने जोडलेले आहेत, हाच बंध आपल्याला अनुभवायचा आहे व अधिक दृढ करायचा आहे.

आपल्याला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याची गरज वाटू लागली त्यापूर्वी कशी परिस्थिती होती हे आपण समजून घेऊ. काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या नद्या आणि तलावांमध्ये स्वच्छ पाणी होते, आपली हवा शुद्ध होती व भरपूर ऑक्सिजन मिळत होता, आपल्या भोवतालच्या आवाजाच्या पातळ्या ६० डेसिबलपेक्षा जास्त नव्हत्या (माणसाच्या कानांना सहज सहन होईल असा आवाज), आपल्या समुद्रामध्ये भरपूर मासे होते, आपली जंगले बरीच विस्तारलेली होती ज्यामुळे माणसांव्यतिरिक्त हजारो प्रजातींसाठी जागा होती. मात्र हळूहळू सर्व गोष्टींचा ऱ्हास होऊ लागला, आपली लोकसंख्या सतत वाढत राहिली व आपली जीवनशैली व आपली हावही वाढत राहिली. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याला शहरांमध्ये रस्त्याच्या कडेने जंगली फुले व फुलपाखरे दिसायची, तसेच आपल्या अवतीभोवती अनेक पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत असे. आता ते सगळे नाहीसे झाले आहे व आता आपल्याला फक्त नद्यांमध्ये प्रदूषित पाणी, अवतीभोवती कचऱ्याचे ढीग व काँक्रीटचे रस्ते पाहायला मिळतात. आता फुलपाखरांऐवजी आपल्याला झुरळे दिसतात, जंगली फुलांची जागा आता वाढदिवसांच्या फलकांनी घेतली आहे ज्यावर बटबटीत चेहरे झळकत असतात ज्यांना आपण स्थानिक नेते म्हणतो. आकाश धुराने भरलेले असते व आपल्या अवतीभोवती वाहनांचे कर्कश्श हॉर्न वाजत असतात भरीतभर म्हणून चौकाचौकात ध्वनीक्षेपकावर डिजेचे कानठळ्या बसविणारे संगीत ऐकू येत असते. आपण जी काही परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे, त्यामुळे केवळ वन्य प्राणीच नव्हे तर अनेक माणसांनाही एक पेलाभर शुध्द पाण्यासाठी वणवण करावी लागते व आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे.

आता तुम्ही विचाराल (१२वीतील विद्यार्थी म्हणून) की ही माझी महत्त्वाची वर्षे आहेत व चांगले महाविद्यालय मिळावे यासाठी चांगले गुण मिळवणे आवश्यक आहे, म्हणजे मला पुढे जाऊन चांगली नौकरी मिळू शकते, मला ज्ञानार्जनासोबतच थोडेफार पैसेही कमवायचे आहेत व माझे करिअर घडवायचे आहे, या सगळ्यात माझ्याकडे पर्यावरणाविषयी विचार करायला वेळ कुठे आहे. मी तुमच्या वयाचा असताना मला, पर्यावरण संवर्धन वगैरे तर सोडाच पर्यावरणाविषयी फारशी माहितीही नव्हती. म्हणूनच तुमची पिढी दुर्दैवी आहे कारण तुम्हाला ज्ञान मिळवावे लागते, पैसा कमवावा लागतो व त्याचसोबत पर्यावरणही वाचवावे लागते,तो तुमच्या पिढीला लागलेला शाप आहे, मात्र तुम्हाला त्याचेच रुपांतर एका संधीत करायचे आहे. प्रत्येक दशकामध्ये एखाद्या विषयाचे किंवा शाखेचे किंवा उद्योगाचे वर्चस्व राहिले आहे व केवळ हेच दशक नव्हे तर संपूर्ण शतकावर पर्यावरणाचे वर्चस्व राहील, ज्याचा तुम्ही तुमच्या करिअरसाठी जास्तीत जास्त वापर करू शकता (किंवा करून घ्यावा लागेल), ज्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होईल व त्यालाच मी शाश्वतता असे म्हणतो. कुणीही व्यक्ती उपाशी पोटी पर्यावरणाचे रक्षण करू शकत नाही किंबहुना माणसाचे रिकामे पोट हा पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू आहे.

नाहीतर ऍव्हेंजर्स एंड गेममधील (हा मार्व्हल स्टुडिओजचा चित्रपट आहे) थॅनोसने पर्यावरण संवर्धनाचा सर्वोत्तम (व सर्वात सोपा) मार्ग दाखवला आहे, तो म्हणजे, एका चुटकीसरशी सध्याच्या लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या हटवून टाकायची, यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल, मात्र आपल्यापैकी बहुतेक जण असे करू शकत नाहीत, बरोबर? म्हणूनच, दुसरा मार्ग म्हणजे तुमच्या संबंधित क्षेत्रातील किंवा विषयातील ज्ञानाचा उपयोग करणे व पर्यावरणासाठी त्याचा वापर करणे, हा शाश्वत मार्ग आहे. उदाहरणार्थ तुम्ही कला शाखेचे विद्यार्थी असाल तर तुमच्या कलात्मक निर्मितीमध्ये निसर्ग हा आधार असू द्या मग ती चित्रे असतील, एखादे सादरीकरण, लेख किंवा चित्रपट. म्हणजेच तुम्हाला या कलात्मक निर्मितीमधून पैसेही मिळू शकतात व तुम्ही लोकांना जागरुकही करू शकता तसेच तुमच्या ग्राहकांच्या ब्रँडची उत्तम प्रसिद्धीही होईल. तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी असाल, तर पर्यावरण संवर्धनाशी संबंधित तंत्रज्ञान हा आजकाल परवलीचा शब्द झाला आहे. आज जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे इलॉन मस्क, जो हरित उर्जेवर चालणारी वाहने तयार करतो. तुमचे करिअर संतुलित ठेवण्यासाठी व पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी याहून अधिक चांगले कोणते उदाहरण असू शकते.हे जग अधिक चांगले व्हावे यासाठी तुमच्या ज्ञानाचा वापर करा, पर्यावरणास पूरक तंत्रज्ञानांचा शोध लावा, तुम्ही अशा कितीतरी गोष्टी करू शकता. तुम्ही आयटी (माहिती तंत्रज्ञान) क्षेत्रात काम करत असाल तर मला तुम्हाला सांगावेसे वाटते, की पर्यावरण संवर्धनातील सर्वात महत्त्वाचादुवा म्हणजे डेटा व तो प्रचंड मोठ्या प्रमाणावर आवश्यक असतो. म्हणजे अभियंत्यांना त्यांची उत्पादने नेमक्या गरजांनुसार तयार करता येतील कारण कोणत्याही शाश्वत उत्पादनासाठी अचूक डेटा हा अत्यावश्यक असतो. सरतेशेवटी, तुम्ही तुम्ही वाणिज्य शाखेचे असाल व एक लेखापाल पर्यावरणासाठी काय करू शकतो असा विचार करत असाल, तर कोणत्याही निधीवर तुमचे नियंत्रण असते, बरोबर? तुमचे पैसे योग्य पर्यावरण पूरक उत्पादनांमध्ये तसेच संशोधन व विकासामध्ये गुंतवा, कारण निधीच्या अभावामुळेच पर्यावरण संवर्धन अतिशय मागे पडते.

मुलांनो, पर्यावरणाच्या बाबतीत तुमची पिढी कदाचित आमच्यापेक्षा कमनशीबी असेल, मात्र तुम्ही कमनशीबीच राहायचे ठरवले तर, मुलांनो,मुलांनो पर्यावरणाच्या बाबतीत तुमची पिढी कदाचित आमच्यापेक्षा कम नशिबी असेल, मुलांनोपर्यावरणाच्या बाबतीत तुमची पिढी कदाचित आमच्यापेक्षा कमनशीबी असेलमात्र तुम्ही पण कमनशीबीच राहायचे ठरवले तरत्यासाठी तर पुढची पिढी तुम्हालाच दोष देईल हे लक्षात ठेवा. तुम्हाला तुमच्या भविष्यातील करिअरसाठी मनःपूर्वक शुभेच्छाएवढे बोलून रजा घेतो!

संजय देशपांडे      

संजीवनी डेव्हलोपर्स

ईमेल आयडी – smd156812@gmail.com