“माझ्या मुलांनी व नातवंडांनी अशा एका जगात जगावे जेथे स्वच्छ हवा, पिण्यासाठी शुद्ध पाणी व समृद्ध वन्यजीवन असेल असे मला वाटते, म्हणूनच मी माझे आयुष्य वन्यजीवन संवर्धनासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजे मी हे जग थोडेसे अधिक चांगले करू शकेन” … बिंदी आयर्विन
बिंदी सू आयर्विन ही एक ऑस्ट्रेलियन दूरचित्रवाणीवरील सादरकर्ती, वन्यजीवन संवर्धक, प्राणी संग्रहालयाची व्यवस्थापक व नायिका आहे. ती दिवंगत पर्यावरणवादी व दूरचित्रवाणीवरील सादरकर्ते स्टीव्ह आयर्विन व त्यांची वन्यजीवन संवर्धक पत्नी टेरी आयर्विन यांची थोरली मुलगी आहे, ती सध्या ऑस्ट्रेलियामध्ये एका प्राणिसंग्रहालयाची मालक आहे. अशी पार्श्वभूमी असल्यावर ती समृद्ध वन्यजीवन असलेल्या भविष्याची स्वप्न पाहाते यात काहीच आश्चर्य नाही. मात्र जोपर्यंत आपण सगळे जण तिच्या कामात योग्य प्रकारे हातभार लावत नाही, तोपर्यंत तिचे हे स्वप्न केवळ स्वप्नच राहील यात शंका नाही. बिंदीसारखे अनेक लोक आहेत व म्हणूनच माझ्यासारख्या वन्यजीवप्रेमींच्या मनामध्ये अजूनही वन्यजीवनाच्या भविष्यासाठी आशा जिवंत आहे. अशाच एका उपक्रमाअंतर्गत, जंगल बेल्स (आरती कर्वे व हेमांगी वर्तक यांची संस्था), जी शहरातील महिलांमध्ये वन्यजीवनाविषयी जागरुकता निर्माण करते, तसेच आता पूर्णपणे वन्यजीवन संवर्धनाला आयुष्य वाहिलेले विनोद बारटक्के हे आयटी व्यावसायिक व नेचर वॉक या संस्थेचे अनुज खरे यांनी एकत्र येऊन पुणे, महाराष्ट्राभोवतालच्या वन्यजीवनाविषयी अतिशय सुंदर माहितीपट बनविला आहे. या माहितीपटाला मगरपट्टा सिटीचे विकासक श्री. सतीश मगर यांनी आर्थिकमदत केली (अतिशय महत्त्वाचा घटक) व दस्तुरखुद्द माननीय शरद पवार, खासदार, पुणे यांनी यूट्यूबवर त्या चित्रपटाच्या प्रसारणाची घोषणा केली. या कार्यक्रमामध्ये आमची श्री. मनिंदर गिल, आयएएस यांच्याशी ओळख झाली, जे जागतिक बँकेच्या पर्यावरण व सामाजिक विभागामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी स्वतःहून आम्हाला पुण्यासारख्या शहरांच्या भोवती वन्यजीवन संवर्धनासाठी आणखी काय करता येईल असे विचारल्याने आम्हाला अतिशय आनंद झाला.
आम्ही त्यांना जे काही सांगितले ते इथे देत आहे. हे मी माझ्या शब्दात मांडले असले तरीही यासाठी विनोद, अनुज, हेमांगी, आरती या सगळ्यांनी माहिती दिली आहे. जंगल बेल्सने श्री. गिल यांनी जी आवृत्ती पाठवली आहे ती अधिक नेटकी व व्यावसायिक आहे व त्यांच्याकडे जे काही अधिकृत पद आहे त्याचा विचार करता हे स्वाभाविक आहे. मी स्वतःही वाईल्ड लाईफ पुणे या माहितीपटासाठी पटकथालेखक व सल्लागार म्हणून माझा खारीचा वाटा उचलला आहे. म्हणूनच वन्यजीवन संवर्धनाच्या प्रस्तावाविषयी माझे विचार मांडण्याचा मी विचार केला कारण जागतिक बँकच कशाला कुणीही पुढाकार घेऊन त्यामध्ये त्याची किंवा तिची भूमिका पार पाडू शकते, असे मला वाटते. चला तर आपण हे मुद्दे पाहू.
शाश्वत वन्यजीवन संवर्धन:
आपण सगळे वन्यजीवनाविषयी बोलतो व आपण त्यासाठी काहीतरी केले पाहिजे हे प्रत्येकजण मान्य करतो, मात्र बहुतेकवेळा नेमके काय करावे, कशाप्रकारे करावे व कुणी करावे या तीन प्रश्नांपाशी येऊन हा शोध थांबतो. योग्य दृष्टिकोन ठेवून, सर्वसमावेशक विचार करून वन्यजीवन संवर्धनाशी संबंधित वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात हे लोकांना सांगण्याचा हा लहानसा प्रयत्न आहे. जंगल बेल्सला केवळ प्रश्नांमध्ये अडकून राहण्याऐवजी त्यावर तोडगा काढण्यात व त्यावर काम करण्यात अधिक आनंद वाटतो. आम्ही दोन प्रायोगिक ठिकाणी ज्या उपाययोजना राबवणार आहोत त्या सुचवत आहोत, त्यातील एक आहे कडबनवाडी, हे पुणे, महाराष्ट्राजवळील गवताळ क्षेत्र आहे व दुसरे म्हणजे प्रसिद्ध ताडोबा व्याघ्र अभयारण्य, महाराष्ट्र येथील जुनुना बफर गेट. ही दोन ठिकाणे निवडण्याचे कारण म्हणजे आम्ही ज्या उपाययोजना राबवत आहोत त्याचा परिणाम मोजण्यासाठी काहीतरी मोजमाप हवे. वरीन दोन प्रकरणांचा अभ्यास करून नंतर आपण त्याच्या प्रतिकृती इतर ठिकाणी राबवू शकतो व आधी या उपाययोजना दोन ठिकाणी राबवल्यानंतर त्यातील त्रुटी लक्षात येण्यासही आम्हाला मदत होईल. वन्यजीवन संवर्धन हे काही अभियांत्रिकीतील सूत्र नाही जे तुम्ही गूगलवरून कट, कॉपी, पेस्ट करू शकता किंवा एखाद्या संशोधन व विकास प्रयोगशाळेमध्ये तयार करू शकता. त्याचा प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात अभ्यास करावा लागतो व त्यानंतरही प्रयोग करत, चुकतमाकत या उपाययोजना राबवाव्या लागतील. त्यासाठीही प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील परिस्थितीचा व्यवस्थित अभ्यास करून कागदावर एक यंत्रणा तयार करणे आवश्यक आहे.
आम्ही वन्यजीवन संवर्धनाचे तीन पैलू हेरले आहेत; पहिला म्हणजे जागरुकता व शिक्षण, दुसरा म्हणजे माणूस व वन्यप्राण्यांचे सहज सहजीवन म्हणजे योगायोगाने किंवा हेतूपूर्वक संघर्ष टाळणे व तिसरा म्हणजे संरक्षणासाठी पायाभूत सुविधा सशक्त करणे. ही अगदी अचूक योजना आहे असे माझे म्हणणे नाही मात्र जोपर्यंत तुम्ही कागदावर ती मांडत नाही तोपर्यंत तुम्हाला एक व्यवस्थित योजना तयार करता येणार नाही, असा विचार या प्रयत्नामागे होता.
जागरुकता व शिक्षणाद्वारे वन्यजीवन संवर्धन
निसर्गाचे महत्त्व व त्यापुढील धोके याचे याविषयी सामान्य जनतेमध्ये जागरुकता निर्माण करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. निसर्गाला असलेला धोका कमी करण्यासाठी ठोस पावले उचलणे व उपाययोजना करणे हा यामागील हेतू आहे कारण शेवटी या सगळ्याचा आपल्यावर निश्चितपणे परिणाम होणार आहे.
माणसाचे वागणेच पर्यावरणाला अपाय करण्यासाठी बहुतांशी जबाबदार आहे यात शंका नाही.औद्योगिक क्रांतिनंतर हरितगृह वायूंचे केंद्रीकरण तिपटीहून अधिक प्रमाणात वाढले आहे ही वस्तुस्थिती पाहिली तर आपल्यावर त्याचा परिणाम अधोरेखित होतो. म्हणूनच, आपली पर्यावरणविषयक जागरुकता वाढवणे व आपल्या वर्तनात बदल घडवून आणणे ही आपली जबाबदारी आहे.
पर्यावरणाविषयीची जागरुकता हा आपल्या आयुष्याचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. पृथ्वीवरील शाश्वतता सुरक्षित ठेवण्यासाठी, प्रत्येकाने पर्यावरणाविषयी अधिक जागरुक होणे आवश्यक आहे.
विशेषतः लहान मुलांना पर्यावरणविषयक जागरुकतेचे महत्त्व शिकवणे अत्यावश्यक आहे, ज्यामुळे आपल्या भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करता येऊ शकेल. आताची परिस्थिती पाहता, आपल्या कृतींचा भविष्यातील पिढ्यांवर सर्वाधिक परिणाम होईल. म्हणूनच, आपण आपल्या लहान मुलांना पर्यावरणाविषयी अधिक जबाबदारपणे व सजगपणे वागण्यासाठी आवश्यक ती साधने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
प्रस्तावित उपक्रम:
1) एक परस्पर संवाद केंद्र उभारणे
केंद्रामध्ये पुढील सुविधा असतील:
क) स्थानिक वन्यजीवन व संबंधित भूप्रदेशाची (वसतिस्थाने) छायाचित्रे प्रदर्शित करणे.
ख) वन्यजीवन संवर्धनासाठी ही वसतिस्थाने का महत्त्वाची आहे हे समजून सांगणारे साहित्य
ग) सर्व छायाचित्रे छापून घेता येणार नाहीत त्यामुळे काही छायाचित्रे डिजिटल मॉनिटरचा वापर करून प्रदर्शित करता येतील.
घ) आपण कडबनवाडीतील गवताळ पट्टे/झुडुपांच्या प्रदेशावर एक स्वतंत्र माहितीपट तयार करू शकतो. जेव्हा स्थानिक लोक असे ओळखीचे प्रदेश/लोक (स्थानिकांचे + वन कर्मचाऱ्यांच्या मुलाखती) व प्राणी पाहतील तेव्हा ते त्यांना अधिक भावेल
ङ) निसर्ग/वन्यजीवन संवर्धनाशी संबंधित पुस्तकांचे एक लहानसे वाचनालय
पर्यावरणाशी संबंधित माहितीपटांद्वारे, आम्हाला जागरुकता वाढवायची आहे व प्रेक्षकांशी स्थानिक संदर्भ असलेल्या विविध मुद्द्यांविषयी चर्चा करायची आहे, ज्यामध्ये जंगलतोडीपासून ते प्लास्टिकच्या प्रदूषणाचा समावेश होतो.
मानव व प्राण्यांमधील संघर्ष व तो कमी करण्यासाठीच्या उपाययोजना
माणूस-प्राण्यांमधील संघर्षाची व्याख्या माणसाच्या सामाजिक, आर्थिक किंवा सांस्कृतिक जीवनावर व वन्यजीवन संवर्धनावर किंवा पर्यावरणावर नकारात्मक परिणाम करणारा कोणताही संघर्ष अशी करता येईल. प्राणी व माणूस शेकडो वर्षांपासून पृथ्वीवर एकत्र जगत आले आहेत. इतिहासपूर्व काळात माणसाच्या पूर्वजांवरील हल्ल्यांपासून या इतिहासातील संघर्षाची सुरुवात झाली, त्यानंतर पिकांची नासधूस व गाई-गुरांवरील हल्ले सुरू झाले. मात्र आता हा संघर्ष अधिक वारंवार, गंभीर व व्यापक होत चालला आहे ज्यामुळे वन्यजीवन व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक होत चालले आहे.
माणूस व प्राण्यातील वाढत्या संघर्षाची बरीच कारणे आहेत, उदाहरणार्थ माणसाचा वन्यजीवनाच्या वसतिस्थानांमधील वाढता हस्तक्षेप, काही वन्य प्राण्यांच्या संख्येमध्ये सुधारणा व वाढ, पर्यावरण व जमीनीच्या वापरामधील व्यापक बदल. माणूस व प्राण्यातील संघर्ष हा गुंतागुंतीचा असतो, त्याचे सहजपणे विश्लेषण करता येत नाही तसेच तोडगेही काढता येत नाहीत. ह्या समस्येचे गुंतागुंतीचे स्वरूप पाहता, सरकारने माणूस-प्राण्यांमधीलसंघर्ष कमी किंवा कमीत कमी व्हावा यासाठी बहुआयामी, सर्वसमावेशक व आंतरविद्याशाखीय धोरणे राबवली आहेत. महाराष्ट्रामध्ये माणूस व वन्य प्राण्यातील संघर्षामध्ये झालेल्या मृत्यू/इजेसाठी सानुग्रह भरपाई, पिकांच्या नुकसानासाठी दिली जाणारी नुकसानभरपाई, जनावरांवरील हल्ल्यांसाठी दिली जाणारी भरपाई भारतामध्ये सर्वात जास्त आहे. त्याचशिवाय डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेसारख्या योजनाही, माणूस व वन्य प्राण्यांमधील संघर्ष कमी करण्यासाठी राबवल्या जात आहेत.
आमची दोन क्षेत्रांमध्ये पुढील प्रकल्प प्रस्तावित करण्याची योजना आहे जे आपले पथदर्शी प्रकल्प असू शकतात.
प्रस्तावि
प्रस्तावित कृती 1: आम्ही जलद बचाव पथके तयार केली आहेत जी अतिशय परिणामकारक सिद्ध होत आहेत. बहुतेक प्राण्यांचे मृत्यू प्राणी विहीरीमध्ये पडून झाल्याचे आढळून आले आहे. या विहीरी दुर्दैवाने झाकलेल्या नसतात व प्राणी दुसऱ्या प्राण्यांचा पाठलाग करताना यामध्ये पडतात, त्यांना इजा होते, ते अतिशय दमलेले असतात व अनेकदा यामुळे त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे, आमचा प्रकल्प ज्या क्षेत्रांमध्ये चांगले वन्यजीवन आहे त्याच्या आजूबाजूच्या भागातील विहीरी हेरून ठेवेल. या विहीरींभोवती संरक्षक भिंत बांधली जाईल, वक्रनलिकांवर झाकण घातले जाईल, जनावरांच्या संरक्षणासाठी गोठे बांधले जातील यामुळे वन्य प्राण्यांशी त्यांचा संघर्ष व मृत्यू टाळता येतील
प्रस्तावित कृती 2: असेही आढळून आले आहे की उन्हाळ्यादरम्यान, तापमान वाढते व पाण्याची मोठ्या प्रमाणावर वाफ झाल्यामुळे नैसर्गिक पाणी आटते. प्राणी पाण्याच्या शोधात भटकतात व वन्यक्षेत्राच्या सीमेवरील गावांमध्ये दुर्दैवाने प्रवेश करतात. इथेच संघर्षाला सुरुवात होते. यासाठी कृत्रिम पाणवठे बांधून त्यांना पाण्याचे टँकर/कूपनलिकांमार्फत पाणी पुरवठा करायची योजना आहे. हे प्रामुख्याने उन्हाळ्यादरम्यान आवश्यक आहे. त्याशिवाय या क्षेत्रांमध्ये अन्नही उपलब्ध करून दिल्यास ही समस्या सोडविण्यास निश्चिरपणे मदत होईल.
प्रस्तावित कृती 3: व्यापक प्रसिद्ध मोहीम आयोजित करणे व स्थानिक गावांमध्ये प्राणी-माणूस संघर्षाविषयी जागरुकता निर्माण करणे.
कार्यक्षेत्राची व्याप्ती:
क. पुणे वन्य विभागामध्ये देशातील काही सर्वोत्तम, असुरक्षित शुष्क वसतिस्थाने आहेत. त्यापैकी कडबनवाडी हे एक क्षेत्र आम्ही सुचवत आहोत. हे भारतीय लांडगा, चार शिंगी काळवीट, पट्टेरी तरस, करड्या रंगांचे ठिपकेदार मांजर, चिंकारा इत्यादी विविध महत्त्वाच्या वन्य प्रजातींचे वसतिस्थान आहे; यापैकी काही प्रजाती जागतिक पातळीवरही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वन्यजीवनाव्यतिरिक्त, हे वसतिस्थान मानवी जीवन व उपजीविकेचाही महत्त्वाचा घटक आहे. धनगरांसारखे पशुपालन करणारे समुदाय त्यांच्या उपजीविकेसाठी या वसतिस्थानांवर अवलंबून असतात. ही क्षेत्रे पाणलोट क्षेत्रेही तयार करतात त्यामुळे या कोरडवाहू/निमकोरडवाहू भूप्रदेशामध्ये पाण्याची पातळी टिकून राहते.अशाप्रकारे,हे असुरक्षित भूप्रदेश केवळ जैवविविधता असलेली पाणलोट क्षेत्रेच नाहीत, तर महत्त्वाचे सामाजिक-आर्थिक भूप्रदेश आहेत ज्यांचे अतिशय बारकाईने व्यवस्थापन व संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. मात्र, या प्रदेशांना काहीच कायदेशीर संरक्षण नसल्यामुळे, ही नैसर्गिक वसतिस्थाने मानवाने संकुचित दृष्टीकोनातून केलेल्या कृतींच्या परिणामांमुळे कधीही नष्ट होऊ शकतात.
ख. ताडोबा व्याघ्र प्रकल्प: ताडोबाहा भारतातील आघाडीचा व्याघ्र प्रकल्प आहे. तो महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. हे अभयारण्य १७२५ चौ. किमीच्या क्षेत्रामध्ये पसरलेले आहे व तेथे झाडे-झुडुपे व वन्यप्राण्यांची समृद्ध विविधता आहे व वाघांची संख्याही भरपूर आहे. तेथे प्रवेश करण्यासाठी २० प्रवेश द्वार आहेत ज्यापैकी ६ कोअर क्षेत्राची व १४ बफर क्षेत्राची आहेत.ताडोबाच्या पर्यटनामधून हजारो लोकांना रोजगार मिळतो. या क्षेत्रातील लोकसंख्या अतिशय मोठी आहे. या अभयारण्याच्या सीमेवर बरीच गावे वसलेली आहेत, म्हणूनच या भागामध्ये माणूस व प्राण्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता अतिशय जास्त असते.
हि २ क्षेत्रेच का:-
१. आमचा जंगल बेल्सचा चमू आधीपासूनच या २ जागी काम करतोय. आम्ही तिथल्या स्थानिक लोकांना ओळखतो व आम्हाला त्या भागाची चांगली ओळख आहे.
२. आम्ही आधीपासूनच वन विभागासोबत काही काम करत आहोत, यामुळे प्रस्तावित पथदर्शी प्रकल्पाच्या समन्वयामध्ये व अंमलबजावणीमध्ये मदत होईल.
—–
वन्य जीवन संरक्षकांसाठी पायाभूत सुविधा
वन्यजीवन संवर्धनातील सर्वात महत्त्वाचा कच्चा दुवा म्हणजे वन्यजीवनाविषयी अज्ञान, मात्र आपण ते कारण देऊ शकत नाही, कारण आपण अपघातामध्ये होणारे मानवी मृत्यू किंवा नुकसानासाठी आपण हाच तर्क वापरू शकतो का? याचे उत्तर नाही असेच आहे, कारण जेव्हा कोणत्याही अपघातामध्ये माणसाचा जीव जातो किंवा केवळ अपघात झाला तरीही कायदा हे कारण मान्य करत नाही की तुम्हाला वाहतुकीचे नियम किंवा कायदे माहिती नव्हते व म्हणून एखाद्या व्यक्तीचा जीव जाण्यासाठी तुम्ही कारणीभूत ठरलात, म्हणूनच तुम्हाला माफ केले जावे. नेमके याच कारणामुळे लोक खाकी गणवेशाचा आदर करतात मात्र वनरक्षकांचा करत नाहीत. म्हणूनच लोकांना वन्य प्राण्यांचा जीव माणसांइतका महत्त्वाचा वाटत नाही. यासंदर्भातील कायदा बदलण्यासाठी थोडा वेळ लागेल मात्र तोपर्यंत आपण वन्यजीवनाचे संरक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा सशक्त करू शकता जे या कामासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. अलिकडच्या काळामध्ये अनेक घटना घडल्या आहेत ज्यामध्ये वनरक्षकांवर त्यांना जंगलामध्ये पायी चालत गस्त घालावी लागत असल्यामुळे तसेच कनिष्ट वर्गातील कर्मचाऱ्यांवर वन्य प्राण्यांनी तसेच अवैध शिकाऱ्यांनी हल्ला केला आहे व त्यांच्याकडे स्वसंरक्षणासाठी काहीही नसते, त्यामुळे त्यांचे मनोबल अतिशय खच्ची होते.
आपण वन रक्षक पथकांची यासंदर्भात मदत करू शकतो, त्यांना विशेष सूट तसेच अद्ययावत संच देऊ शकतो ज्यामध्ये त्यांच्यासाठी जीवनरक्षक साधने तसेच औषधे असतात. इथे थोड्याशा मदतीमुळे किती फरक पडू शकतो याचे एक उदाहरण देतो, कान्हा जंगलामध्ये काही वर्षांपूर्वी आम्ही सुरक्षित, कमी वजनाचे, गुडघ्यापर्यंत उंचीचे रबरी शूज दिले होते व त्यामुळे वनमजुरांमध्ये साप चावण्याच्या घटनांची संख्या जवळपास ७०% कमी झाली, जे पावसाळ्यानंतर जंगलातील रस्त्यांवर सफाईचे काम करत होते. त्यांना बॅटरीवर चालणारी वाहने, तसेच सर्व प्रकारच्या हवामानामध्ये वापरता येतील अशा सुरक्षित स्लिपिंग बॅग, साप चावल्यास विष उतरवणाऱ्या औषधासह प्रथमोपचार संच, अशा कितीतरी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे कारण बाह्य जगातील कोणत्याही मदतीशिवाय एख्याद्या निस्सीम वन्यप्रेमी व्यक्तीलाही जंगलामध्ये ३६५ दिवस राहणे अवघड आहे.
मित्रहो, जागतिक बँकेकडून जंगल बेल्सच्या उपक्रमाला वित्त पुरवठा होईल का हा स्वतंत्र मुद्दा आहे, मात्र आपण प्रत्येक जण पुढे येऊ शकतो ववन्यजीवन संवर्धनामध्ये वरीलपैकी कोणत्याही घटकांचे योगदान देऊ शकतो.१३० कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशामध्ये वन्यजीवन किंवा निसर्गाच्या संवर्धनासाठी मदत करायला केवळ काही हातच पुढे येतात ही अतिशय दुर्दैवी बाब आहे व खरेतर वन्यजीवन संवर्धनातील सर्वात मोठा अडथळा आहे. या देशातील एक दशांश लोकसंख्येनेही वन्यजीवन संवर्धनामध्ये योगदान दिले, तर प्रत्येक भारतीयासाठी बिंदीचे स्वप्न साकार होऊ शकेल. कारण या देशाला अतिशय समृद्ध वन्यजीवनाचा वारसा लाभला आहे व आपणच त्याचे संवर्धन करून तो नामशेष होण्यापासून वाचवू शकतो!
कृपया,खाली दिलेल्या लिंकवर जाऊन “वाईल्ड वाईल्ड पुणे” आवर्जून पाहा व शेअर करा, एवढेकेलेत तरीही वन्यजीवन संवर्धनामध्ये तुमची भूमिका हिरोची असेल हे नक्की!
https://www.youtube.com/watch?v=J7_pKK0QAqI
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलोपर्स
ईमेल आयडी – smd156812@gmail.com